होस्टेल ची वाट

अगोदर काही महिने बाहेर रूम करून राहिल्यानंतर पहिल्या वर्षाच्या परिक्षा आटोपल्या होत्या .आता करायला तसेच फार काही  विशेष नव्हते , म्हणून आमच्यापैकी एकाने होस्टेल ला शिफ्ट होण्याचा प्रस्ताव मांडला आणि इतर दोघांनी बिनविरोध तो पारित देखील केला .साधारणत कॉलेजमध्ये लेक्चर ,प्रॅक्टिकल सुरू असताना एक  गोष्ट आमच्या लक्षांत आली होती . सिनिअर लोकामध्ये दोन प्रमुख प्रजाती होत्या . होस्टलाईट  की जे होस्टेल वर राहत होते आणि एक लोकलाईट की जे स्थानिक होते . त्यात आमच्या सारख्या कोणत्याही गटात न येणाऱ्या प्राणिमात्रांच्या जीवांची किंमत नगण्य आहे हे आम्हाला आतापर्यंत समजून गेले होते . एकमेकांविरुद्ध लढणारी मात्र सोबतच राहत काम करणाऱ्या हया २ प्रजाती होत्या .एक गट दुसऱ्या पेक्षा किती वरचढ आहे आहे सदैव चर्चा आमच्या कानावर येत असायची . एकमेकांना वाईट आणि तुच्छ लेखन स्पर्धा तर वर्षभर ज्युनिअर यांना ऐकावी लागायची . यात तर कधीकधी कॅन्टीनमध्ये नाष्टा करीत असताना तोंडओळख असलेल्या आमच्या सीनियरने आमच्या नाश्त्याचे पैसे दिलेले पाहून थोडेसे बरे वाटायचे .हॉस्टेल ला राहणारी लोक एवढीही वाईट नसतात जसे लोकलाईट नेहमी सांगत असतात अस वाटू लागले .                                              मग तो सर्वानुमते पारित झालेला प्रस्तावा नुसार  आम्ही आमच्या रूमवर ची सगळी पुस्तके ,सामान ,कपडे जमा करून होस्टेलला पोहोचलो . पायऱ्या चढून वॉर्डन चया रूम पर्यंत गेलो . वॉर्डन कडून रूम साठी लागणारा अर्ज मागवून घेतला व हातोहात तो माहिती भरून त्यांना दिला .तोपर्यंत तरी सगळे हॉस्टेल अतिशय शांत वाटत होते .सुई जरी पडली तरी आवाज येईल अशी ती शांतता होती . काही बंद खिडक्या तर काही उघड्या ,काही दरवाजे बंद तर काही उघडे  मोठी कॉमन रूम ,त्यामध्ये उगाच सुरू असलेला टीव्ही, रंग उडालेल्या भिंती आणि थोडाफार रंग उरलेल्या  गंज लागलेल्या खिडक्या असे ते हॉस्टेल होते .वॉर्डन ने आम्हाला अर्ज तपासून एक रूम अलॉट केली . तिथे जाऊन एकत्र राहण्याचा सल्ला दिला .आभारप्रदर्शन करून झाले की आम्ही वाटी लागलो .                                 एखादा ज्युनिअर   होस्टेल ला चुकून आला तर त्याला अगोदरच एकट राहत असलेल्या सीनियर च्या रुम मध्ये सोबत राहावे लागत असे तशी सोय नसल्यास सगळया ज्युनिअर नी कॉमन रूम मध्ये राहावे लागत असे .  मात्र आता आम्ही सोबत आल्याने तसं करण्याचा प्रश्न नव्हता .आम्ही एकाच रुममध्ये राहू  का अशी आम्ही वॉर्डन ला विनंती केली व त्यांनी देखील ती मान्य केली होती .मग सगळे सोपस्कार पार पाडून  आम्ही आमच्या निवाऱ्या कडे वळालो . पायर्‍या उतरून खाली आलो व लांब अशा कॉरिडॉर ला पार करत पुढे आलो . पुढे जाऊन डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन ओळींनी ८-१० खोल्या एकमेकांसमोर दिसल्या . सध्या तरी कोणताही जीवित प्राण्याचे लक्षणे दिसत नव्हती .त्यात त्यांच्या दरवाजावरती रंगाने काही नंबर लिहिलेले होते .ते पहात पहात आम्ही उजव्या बाजूच्या कोपऱ्यात शेवटीअसलेल्या रूम  कडे वळालो .                                                                                 रूमच्या दरवाजाला लॉक नव्हते ,कडी उघडून आम्ही आत गेलो व सामान टाकले .छतावर पंख्या च्या नावाला असलेलं एक कुरकुर आवाज करणारी वस्तू लटकलेली होती . जमिनीवर पलंगाच्या नावाला असलेला लोखंडी अवजड असा सापळा कोपऱ्यात पहुडलेला होता . मग आम्ही बाजूलाच भिंतीच्या आत असलेल्या दोन्ही बाजूच्या कपाटांमध्ये आमचं सामान भरलं . तेवढ्यात कुणीतरी दरवाजावर जोरात मारली.आम्ही बघितलं तर एक पाच साडे पाच फुटाचा एक किशोरवयीन मुलगा लांब केस असलेला जे एका बाजूने डोळ्यावर झुकलेले होते हातात सिगरेट पकडुन आणि जमेल तेवढा तोंडातून धूर रूम मध्ये सोडत आत आला .त्यामागोमागअजून एक जण पावलावर पावलं लावून आत शिरला .अरे तर हि नवीन आलेली  पोर आहेत का ? असे एकाने दुसऱ्याला म्हटले .तर दुसरा त्याला म्हणाला अरे मला तर वाटते की याना माहीत झालं आज की  आता आपण  काही या वर्षी पास होणार नाही आणि म्हणून पुढच्या सहा महिन्याच्या रूमचं भाडं जायला नको म्हणून नाही इथे होस्टेल ला आले असतील . त्यावर पहिला आमच्या कडे पहात हसत होता. त्याच्या हसण्याने पहिल्याच्या संभाषणावर जणू शिक्कामोर्तबच केले होते .                                                        आम्हाला उद्देशून म्हणाला कारे माझं नाव काय आहे ते माहित आहे का कुणाला ? साधारणतः भेटल्यावर आपलं नाव काय आहे असं विचारण्याची पद्धत आमच्या अंगवळणी होती . इथे तर मात्र उलटी गंगा वाहत होती . पुढे त्यानेच विचारलं माझं सोडा पण या सरांचं तरी नाव माहित आहे का ? दोन्ही प्रश्नांची उत्तर माहीत नसल्यामुळे आम्ही मान खाली घालत उभेच होतो .त्यातील पहिला आपल्या धुराचे साम्राज्य खोलीत दूरवर  पसरवत म्हणाला माझं जाऊन द्या पण सायंकाळपर्यंत मला स्वतः येऊन  जर या सरांचं नाव नाही सांगितलं तर बघा असं म्हणून दोघेही रूममधून निघून गेले .                                                                                 आता हॉस्टेल ला रहाण्याऱ्या त्या दोघांचे नाव कुणाकडून माहीत करून घ्यायचे याचा विचार आम्ही करत होतो . तेवढ्यात लांबून  एक आवाज कानावर आला .फर्स्ट इयर इकडे या रे .मग आम्ही  दरवाजातून बाहेर मान काढून पाहू लागलो तर कॉरिडॉरमध्ये एक जण उभा होता .त्यांने आमच्यापैकी एकाला बोलावलं आणि त्याच्या हातात पैसे देऊन त्याला काहीतरी आणायला बाहेर पाठविलं . पाहता पाहता प्रत्येक रूम मधून एक जण  आपल्या रूम मधून बाहेर येत होता आणि सगळे एकत्र येऊन कॉरिडॉर मध्ये घोळका करून उभे राहू लागले आणि मग आम्ही दरवाजा आतून बंद करून चुपचाप एकमेकांकडे पाहत तिसऱ्या ची वाट पाहत होतो .
मोहन मुठाळ

More ebooks available on Amazon.in
To visit click here
Timed Pop-up Widget Sidebar

Need help?

Chat with us on WhatsApp!

Start Chat

Comments

Popular Posts