जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे २०२० -जनजागृती पर बालनाट्य - " नाही म्हणा तंबाखुला , सुखी चाले संसार आपला "
आज गावाचे मास्तर नेहमीपेक्षा घाईगडबडीत चालत होते . त्यांच्या हातात पिशवी होती .वाटेतच त्यांना गावचे हवालदार भेटले .हवालदार हाताने तंबाखू चोळत होते ते मास्तरांना म्हणाले ,"रामराम मास्तर कसे आहात आणि कोणत्या घाईत निघालात ?". मास्तर म्हणाले ," हवालदार साहेब अहो आज माझ्या मुलीला इंदिराला बघायला बाहेरगावावरून पाहून येणार आहेत . माणसं चांगली आहेत , त्यामुळे काही कमी पडायला नको ". हवालदार त्यावर म्हणाले ," एकदम छान मास्तर सगळं व्यवस्थित होईल ,काळजी करू नका " असे म्हणत हवालदार साहेबांनी तंबाखू असलेला हात पुढे केला आणि दोघांनी तोंडात तंबाखूची चिमूट टाकली आणि दोघेही आपापल्या वाटेला निघाले .
मास्तरांनी घरात आल्यावर सगळी पाहूण चाऱ्याची व्यवस्था नीट झाली की नाही याची बायकोला विचारपूस करून घेतली . इतक्यातच पाहुणे आले . मास्तरांनी त्यांना रामराम करीत बैठकीत आसनं दिली. नवरा मुलगा देखणा आणि हुशार होता .मास्तर त्यावर पाहुण्यांना म्हणाले ," पावणे घर शोधायला काही त्रास नाही तर झाला नाही ना ?".तर त्यावर पाहूणे म्हणतात अहो ," मास्तर अख्ख्या गावात तुम्हाला ओळखणार नाही असा माणूस शोधून तरी सापडेल का ?". असं म्हणताना दोघेही जोरात हसू लागले ,तेव्हा पाहुण्यांनी खिशातली तंबाखूची पुडी काढली आणि तंबाखू चोळून मास्तर समोर धरली . पाहुण्यांनी आणि मास्तरांनी दोघांनीही तंबाखूची चिमूट तोंडात टाकली व इतर गप्पा गोष्टी करायला लागले .
थोड्या वेळानंतर मास्तरांनी आपल्या मुलीला इंदिराला बैठकीत येण्यासाठी आवाज दिला . इंदिरा बैठकीच्या खोलीत आली, तिने पाहुण्यांना नमस्कार केला. मुलाला इंदिरा पाहताच क्षणी पसंत पडली .तशी इंदिरा मुळात देखणी आणि हुशार होतीच .पाहुणचाराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला , इंदिरा घरात गेली .पुढील बोलणीची तारीख देखील ठरली . पाहुणे निघतो अस म्हणाले म्हणून मास्तरांनी घरातून पानसुपारीचा डबा बाहेर आणायला आवाज दिला . मास्तरांच्या बायकोने पानसुपारीचा डब्बा पाहुण्या समोर आणून ठेवला ,पण त्यात सुपारी चुना तंबाखू नव्हता. पाहुण्यांचा अपमान झाला असे मास्तरांना वाटले ,म्हणून मास्तर फार रागावले .
तेवढ्यात इंदिरा घरातून बैठकीच्या खोलीत आली व म्हणाली ," ज्या घरात पान सुपारी तंबाखू बिडी सिगरेट यांची सवय असेल त्या घरात मी नांदणार नाही ". मास्तरांच्या बायकोला पोरीकडे बघून हायसं वाटलं .
इंदिरा चा हा स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भिड स्वभाव पाहून मुलाच्या पसंतीस अजूनच भर पडली व त्याने होणाऱ्या बायकोला पान सुपारी तंबाखू इत्यादी तंबाखूजन्य पदार्थांचे पासून आजीवन दूर राहण्याचं वचन दिलं . पाहुण्यांनी देखील पोरीला शाबासकी दिली आणि लवकरात लवकर लग्न करण्याची तयारी करायची आहे म्हणून मास्तरांचा निरोप घेतलाच पण निघताना मास्तरांना म्हणाले ," अशी गुणी मुलगी सून म्हणून घरात आणायला मुहूर्ताची वाट कशाला ?"
मोहन मुठाळ
Comments