मामा चे अवतारकार्य
तसं बघितलं तर कोणत्याही कार्यालयात कामाला असणाऱ्या शिपायाला मामा म्हणायची सवय सगळ्यांनाच असते . तशीच सवय आम्ही शिकत असणाऱ्या दंत महाविद्यालयातील अंगवळणी होतीच. एकूण दहा ते बारा विभागात आपलं काम साधणाऱ्या मामाची फौज म्हणजे एक वेगळीच सर्कस होती . यातील काही जण तर एवढे मुरलेली होती फक्त शिक्षणाचा अडसर नसता तर ही मंडळी आयुष्यात फार मोठया पदावर बसायच्या लायकीची होते यात कोणतेही दुमत नव्हते .या सर्कशीतील अनेक मामा चे किस्से ऐकायला खरंतर मजा येते मात्र त्यातील विरोधाभास मनाला कधी कधी विचार करायला देखील लावतो .
अशाच एका विभागातील मामांचं कर्तृत्व कर्माने फार मोठं होत ,मोठा या अर्थाने कि ते मामा लहान-सहान कार्याला कधीच हात स्वतःहून लावत नसत . उलटपक्षीे झाडू व्यवस्थित मारण्या ऐवजी झाडू व्यवस्थित लपवून ठेवणे गरजेच्या वेळी रुग्णांच्या गर्दीत हळूच गायब होणे किंवा नको तेव्हा प्रकट होऊन दर्शन देणे यासारखे चमत्कार आणि मोठी अवतारकार्य त्यांच्याकडून मार्गी लागत .वरिष्ठांनी खुर्चीवर कधी बसावं याची वेळ आणि काळ सुद्धा या मामाच्या घड्याळ नुसार चालत असे, कारण खुर्ची आणि टेबल पुसलेच नाही तर वरिष्ठ त्यावर बसणार तरी कसे आणि कधी ? असे एक ना अनेक किस्से मामाच्या करिअर ग्राफ मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली होती .
कितीही महत्त्वाचे काम असले तरीही वरिष्ठांनी या मामाला मोठ्याने ओरडून आणि आदेश देण्याचे मला आठवत नाहीत .उलट इतर वेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र वरिष्ठांचे तिखट बोलणे ऐकून घ्यावे लागायचे . मात्र मामाला कधीही या अग्नी दिव्यातून जावे लागले नाहीत केवढी ही मोठी तपश्चर्या आणि काय ते तपस्वी योगी पुरुष .
विभागात काम करणाऱ्या आणि वरिष्ठांचे सगळे छक्केपंजे माहीत असणाऱ्या, संपूर्ण महाविद्यालयातील मामा यांचे एक सक्षम गुप्तचर संघटनेचेे जाळे वाकबगार होते .यातील एक गुप्तहेर म्हणून मामा ची वट वाखाणण्यासारखी होती .कोण ,कधी काय ,कशासाठी जातो किंवा गेला याचे उत्तर वरिष्ठांना हवे असल्यास ,हमखास या बिरबलाची आठवण काढली जायची . अशा या मामाच्या लीला म्हणजे आयुष्यभराची आठवणच.
Comments