मंगळयान आणि मी
काही दिवसांपूर्वी मंगलयान या चित्रपटाचा शो बघण्यात आला . छोट्या शहरात आजूबाजूला असलेल्या परिस्थितीत हा मंगल अनुभव छान वाटला .घरातून निघताना उपलब्ध इंधनाची म्हणजे खिशातील पैशाची चाचपणी केली .दीडशे रुपये एवढे पैसे होते . उपलब्ध असलेल्या बजेटमध्ये माझ्या मंगळयानाच्या प्रवासाची सफलता मला प्राप्त होईल की नाही अशी धाकधूक आणि उत्कंठा मनात होतीच . एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या वैज्ञानिकाच्या मनात बजेट उपलब्ध नाही असे ऐकल्यावर जसे तरंग उठत असतील त्याचा अनुभव मी घेतला .मात्र तरीही प्रयत्न केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तोच खरा यशस्वी वैज्ञानिक असा विचार करून मी माझ्या गाडीची म्हणजेच यानाच्या पेट्रोलची टाकी उघडून एकूण इंधनाचा तळ शोधला .निदान माझ्या यानाचा प्रवास पेट्रोल पंपापर्यंत तरी होईल अशा अंदाजाने मी गाडीला स्टार्ट मारला आणि मंगल प्रवासाला निघालो .यान म्हणजे गाडी पेट्रोल पंपावर पोहोचताना मात्र डोक्यात मंगलयान आणि मंगळप्रवासाचे चित्र डोळ्यांसमोर येऊ लागले .या नादातच रस्त्यांवर असणारे ओबड-धोबड दगड ,लहान मोठे खड्डे आणि स्पीड ब्रेकर यांच्यामुळे साक्षात मंगळावरच प्रवास करतोय अशी शंका आली . रात्रीची वेळ असल्याने गर्दी रस्त्यावर तशी कमी होती .दुरूनच पेट्रोल पंपावर एकटी दुकटी कामगार मंडळी सोडली तर कोणत्याही जीवित प्राण्याचे लक्षण नजरेस दिसत नव्हते . त्यातच माझ्या यानाचा अर्थातच गाडीचा वेग आणि अवस्था यांचा मेळ घातला तर साधारण दहा मिनिट लागणार त्या ला यान वीस मिनिटे लावत असे .गाडी तशी चांगली मात्र इतर नवनवीन गाड्यांच्या तुलनेत मात्र जुनीच .पेट्रोल पंपावर जवळ तयार होणारा फ्लाय ओवर चे बांधकाम एवढ्या रात्री देखील सुरू होते आणि बरीच पिवळी हेल्मेट घातलेली माणसं मोठ्या जेसीबी ला इकडे तिकडे वळवत होती . रविवारी सुद्धा पोटासाठी रात्री काम करणारे परराज्यातून आलेलेही कामगार मंडळी ही मंगळावरची तर नाही ना असेच वाटून गेले .मात्र पोटाची खळगी भरण्याचे मंगल कार्य पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारी हाड मांसाची माणसं या पृथ्वी नावाच्या ग्रहावर अजूनही आहेत याची देखील आठवण झाली . विकसित मोठी राष्ट्र अवकाश प्रवासात पुढे होती ती सोडल्या खेरीज इतर विकसनशील राष्ट्र मागे होती ,अशाच प्रकारे पेट्रोल पंपावर मी पोहोचताना पेट्रोल टाकणार तेवढ्यात २-३ अतिशय नवीन कोरे करकरीत यान म्हणजे गाड्या माझ्या पाठोपाठ उभ्या राहिल्या .एकंदरीत त्या मोठ्या प्रगत राष्ट्रांना देखील कुठेतरी लवकर जायचे म्हणून घाई होती आणि त्यात त्यांनी माझ्या सारख्या विकासनशील राष्ट्र याच्या मागे थांबून वेळ दवडणे म्हणजे घोर पाप होते . माझ्या याना कडे बघून तरी त्यांना माझे यान म्हणजे एखाद्या विकसनशील देशाने मंगळावर जाण्यासाठी तयार केलेले यान होते .मात्र खिशातील इंधनाकडे म्हणजे उपलब्ध पैशा कडे लक्ष देत मी त्याला ३० रुपयांचे इंधन भरायला सांगितले .तीस रुपये एवढे इंधन टाकताना बघून काही प्रगत राष्ट्र मंडळी माझ्याकडे अशी बघत होती की इतके रुपयांचे इंधन भरायला यांना यानामध्ये पुरतं का ? पण मात्र सवयीनुसार अर्थातच माझ्या ,मी दीडशे रुपयांचा हिशोब करून पुढे निघालो . रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर खिशातील उरलेल्या इंधनाची म्हणजेच पैशांची जुळवाजुळव मनात करू लागलो . शहरात बऱ्याच वर्षांनी मल्टिप्लेक्स उघडल्यानंतर जे की मधल्या काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते तिथे जायला लांबून जावं लागेल . त्यापेक्षा इतर जी सिंगल स्क्रीन थिएटर होतीस त्यातूनच एकाची निवड करून मला रविवारचा दिवस अर्थातच रात्र मंगल मार्गी लावायची होती . जवळ येणाऱ्या थिएटरवर बरीच गर्दी जमली होती . तसं वाटल्याने चांगले झाले माझे मंगलयान अर्थातच माझी गाडी पार्क करून मी तिकीट खडकी वरती तिकीट काढले .बरेच कुटुंब , मित्रमैत्रिणी चा घोळका मित्रा चे ग्रुप इकडे तिकडे उभे होते .संपूर्ण चित्रपट पाहताना या सगळ्या प्रवाशांची सोबत असणार त्यामुळे काळजी मिटली .त्यातील काही ओळख असलेली माणसे होती. एरवी कुठल्याही जागेवरती बसण्याची मुभा देणारा डोअरकीपर मात्र आज असलेल्या गर्दीमुळे सगळ्यांना अंधारात त्याच्या बॅटरीच्या प्रकाशाने एखाद्या सूर्यासारखा मार्गदर्शन करत होता .प्रत्यक्ष मंगळावर जाण्याची गरज असती तर यातील काही मंडळीच तिथेदेखील रांगेत पुढे जायला मागे पाहाणार नव्हती एवढि उत्साहात होती .मी मात्र एकेक करून सगळ्यांना आत जाऊ दिले आणि शेवटी आत गेलो . तिकीट तपासून ना पाहता डोअर कीपर ने दाखवून दिलेली जागा मी आसनस्थ केली . मात्र त्यानंतर चित्रपट सुरू झाल्यावर १० मिनीटात मला माझी जागा बदलावी लागली .एखादि मोहीम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन किती महत्वाचे असते ते मला उमगले. जागा बरी होती काही अडचण नव्हती संपूर्ण चित्रपट बघितल्यानंतर फार बरे वाटले .दुर्दम्य इच्छा शक्ती जवळ असलेल्या वैज्ञानिकांनी कमी साधन संपत्ती असलेल्या परिस्थितीत एखादी मोहीम फत्ते करण्याची किमया पडद्यावर ती फार छान वाटली .मग मात्र मी माझ्या मंगल प्रवासातील मंगळयानाची , खिशातील इंधनाची , मार्गदर्शकाची भूमिका किती महत्वाची होती याचा परत येताना विचार करत होतो .एरवी मंगळाचे दर्शन होऊ नये म्हणून काळजी घेणारे मंडळी आता मात्र मंगल दर्शनाने फार सुखी झाले असेच वाटू केले . त्यामुळे आशा मंगळ यानातून मंगल दर्शन एकदा तरी घ्यावे असा हा चित्रपट म्हणजे मंगळ यान .
मोहन मुठाळ
Comments