गौताळा अभयारण्य आणि नाईट आऊट
हॉस्टेल ला आतापर्यंत बरेच काही करून ,राहून, पाहून ,ऐकून झालं होतं .औरंगाबाद मध्ये राहत असताना दोन तीन वर्ष झाली होती .आता नवीन काही करायला असं काही नजरेस दिसत नव्हतं .मग अशातच एकदा नाईट आउट चा विचार ठरला ,तोही गौताळा अभयारण्यात .दोन दिवस सलग सुट्टीचे दिवस निवडले गेले .बरं नाईट आउट ला गेल्यावर तिथे सोबत खायची व्यवस्था करायचं सामान सोबतच न्यावं लागणार होतं . त्याची जुळवाजुळव सुरू झाली .खिचडी साठी लागणारा तांदूळ ,तेल, मीठ, मिरची ,हळद हे मसाले सर्वप्रथम नोंद करून झाले ,नंतर भज्यांची आठवण आली .त्यासाठी तेल बेसन, कांदा-लसूण,जिरा ओवा आणला गेला . शिजवायला थोडं मोठं भांड लागणार होतं ते मात्र शोधायला उशीर लागला .शेवटी एका मेस वाल्याने बंदोबस्त करून त्याची सोय केली .गाडीने जाणार होतो तर प्रत्येकाच्या पेट्रोल टाक्या आवश्यक तेवढ्या भरून घेतल्या . तेव्हा मोबाईल होते मात्र पावर बँक किंवा तत्सम काही उपकरणे यांची काही ओळख नव्हती .बॅटरी फुल चार्ज करून तो खिशात टाकला हेडफोन ची आठवण होतीच . होस्टेलवरून अशी आमची स्वारी निघाली . साधारण सहाच्या दरम्यान आम्ही आमच्या मार्गी लागलो होतो .उन्हाळा असल्याने संधिप्रकाश देखील बराच होता .तेव्हा वाटेतच उंचावरती मारुतीचं मंदिर लागलं . जय बजरंग बाली की जय करून आमची वानर सेना मार्गस्थ झाली .दर्शन झाल्यावर थोडावेळ पायरीवर थांबलो आणि निघालो. अंधार पडेपर्यंत तरी आम्ही पायथ्याशी पोहोचणार होतो, तसंच तिथे पोहोचलो आणि गाड्या उभ्या करून एका छोट्या डोंगराजवळच्या टोकावर असलेल्या मंदिरा जवळची जागा निवडून झाली . दहा मिनिटातच आम्ही डोंगराच्या टोकावरती होतो . डोंगराच्या टोकावरून गाड्या दिसत होत्या .सूर्य आणि चंद्र दोघांच्या प्रकाशात गाड्या दिसत होत्या .आता वर गेल्यावर तिथल्या महादेवाच्या मंदिरात पाया पडलो आणि प्रथम पाण्याच्या शोधात निघालो .बाजूलाच एक छोटी झोपडी वजा एक जागा होती .तिथे बसलेल्या केशरी रंगाच्या वस्त्रे घातलेल्या साधूला पाण्याची विचारणा केली . एका हातात चिलीम असलेल्या त्याने दुरूनच दुसऱ्या हाताने एका ठिकाणी इशारा करत जागा दाखवली. आम्ही तिकडे वळणार तेवढ्यात अचानक एक केस वाढलेला ,मळका शर्ट पॅन्ट घातलेला आणि पायात काहीही नसलेला वेडसर माणूस समोर आला .पाणी कुठं आहे मी दाखवतो तुम्हाला चला , माझ्यामागे या अस तो म्हणाला . म्हणून आम्ही आमच्यातील दोघांना पाणी भरून आणायला सांगितले ,इतर जणांनी चूल मांडण्याची तयारी सुरू केली नाही.त्यासाठी मोठी ३-४ दगड शोधली . म्हटलं तरी मंदिरात छोटासा एक बल्ब होता.पाणी आणायला गेलेल्या दोघांसोबत अनोळखी माणूस होता. पाण्यासाठी तिथं वाटत तशी नळाची किंवा इतर काही व्यवस्था नव्हती आणि तशी अपेक्षाही नव्हती. एका मोठ्या काळ्या दगडाच्या आत फोडून तयार केलेल्या पाण्याच्या हौदासारखी जागा ती होती .१-२ पायऱ्यासारखे दगड उतरून थंडगार आणि काळाशार दगडाच्या हौदातून ते दोघे पाणी भांड्यात जमा करणार होतो तेवढ्यातच इतका वेळ अतिशय शांत आणि गंभीर असलेल्या त्या वेडसर माणसाने एकदम जोरजोरात चित्र विचित्र आवाज करायला सुरुवात केली ,घाबरून त्या दोघांच्या हातातून भांडी पाण्यात पडली आणि पाण्यात हेलकावे खाऊन तरंगायला लागली .पाणी आणायला गेलेली ती दोघे काही शब्द उच्चाणार तेवढ्यात तो वेडसर माणुस तोंडावर बोट ठेवून त्यांना शांत राहायला सांगतो .ते पाहून पाणी आणायला गेलेलीे दोघं जागीच स्तब्ध उभी राहिली .जणू काही त्यांना पाणी आणि भांड्यांचा विसरच पडला होता .मग त्या वेड्या दिसणाऱ्या माणसाने काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करायला सुरुवात केली. काय तो बोलत होता हे त्याचं त्याला समजत होतं की नाही याची खात्री नव्हती. चूल मांडून उरलेली मुलं इतर सामान बाहेर काढायला बसली. एकाने कांदा कापायला घेतला तर दुसऱ्याने तेल ,मीठ, मिरची, हळद ,ओवा यांची एका ताटामध्ये प्रमाणबद्ध रांगोळी काढली . त्या वेड्या ची पुटपुट संपल्यावरती तो दोघांना सांगू लागला, या पाणवठ्यावर पाणी पिणारयांना पहिल्यांदा हाकलून लावावं लागतं ,नंतरच आपण पाणी पिऊ शकतो .आता मी जोरात ओरडलो तेव्हा ते पळाले .आता तुम्ही पाणी घ्या ,अतिशय स्वच्छ पाणी आहे .इतरांना मात्र काही कळायच्या आत चूल मांडणाऱ्यातला एक जण त्यांना शोधत तिथे पोहोचला .एवढा उशीर का लागतो आहे असं म्हणून तो विचारत होता .तेवढ्यात दोघांनी पटकन भांड्यामध्ये पाणी भरून घेतलं .पाण्याच्या आत चंद्राची प्रतिमा अतिशय सुंदर दिसत होती ,इतक ते स्वच्छ पाणी होते. आता चुलीत लाकडं पेटवायला लहान मोठी लाकडं कुठे मिळतील असं त्या नंतर येणाऱ्या ने वेड्या माणसाला विचारले .त्यावर वेडा म्हणाला चांगली लाकडी इथं नाही मिळायची .थोडं लांब जायला पाहिजे असं म्हणताच पाणी भरायला आलेली दोघेही तुम्ही जा आम्ही आता चुलीजवळ सामान व्यवस्थित सांभाळतो, असं म्हणून त्या दोघांनी लगेच पळ काढला .मग वेडा आणि एक जण लाकडे गोळा करायला लागले .थोडा दूर ,थोडं दूर असं करत करत त्या वेडयाने त्या एकट्याला बरेच लांब नेले. मात्र भीती वाटू लागल्याने आता परत जाऊया अस तो म्हणून लागला मात्र ऐकेल तो वेडा कसला .अजून थोड लांब जाऊया असा तगादा वेड्याने लावला होता .आता आपण येथे एकटे च आहोत या विचाराने त्याने परत चुलीजवळ येण्यासाठी पावलं उलटी केली .पळत पळत येऊन लाकडे त्याने खाली जमिनि वर टाकली . मग थोडं पेट्रोल टाकून ती चूल पेटवली गेली .तसे करताच कांदा भजी काढायला घेतली ,गरमागरम कांदा भजी तयार होत होती व चंद्राच्या प्रकाशात शांत हवेशीर वातावरणात मोकळ्या आकाशाखाली ती तयार करून खायची मजा वेगळी होती .भजी काढून झाली की खिचडी लावली .ती शिजण्या साठी वाट पाहताना आम्ही वरून पायथ्याजवळ नजर टाकली . लांब दूर दहा-बारा घरं लाईटच्या प्रकाशात चमकत होती .मधे मधे कुत्र्याचा आवाज तिथली शांतता भंग करत होता . जणू काही ती कुत्री एकमेकांना आवाज देऊन काहीतरी सांगत होती आम्हाला असेच वाटत होते . खिचडी शिजवून झाली की आम्ही जेवण आटपून घेतले. अंथरूण-पांघरूण खाली जमिनीवर पसरवले आणि झोप तर येत नव्हती मात्र उगाचच आडवं पडून गप्पा मारत होतो .एक दोन जणांनी मोबाईल वरती काहीतरी लावून पाहायला सुरुवात केली, इतक्या वेळात त्या वेड्याची आठवण आली नाही मात्र अचानकच अंधारातून तो वेडा माणूस आमच्या जवळ येऊन बसला .मोबाईल कडे एकटक पाहू लागला. आता मात्र आम्हा सगळ्यांना खूपच भीती वाटत होती. तुमच्या मोबाईल मध्ये काय काय आहे असंच तो वारंवार विचारत होता, मग मात्र आम्ही सगळ्यांनी आमचे मोबाईल बंद करून आम्हाला झोपायचे आहे असे त्याला म्हटले .त्यावर तो काहीच बोलला नाही, मात्र बाजूला असलेल्या मोठ्या दगडावर ती शांतपणे बसला .बराच वेळ तो तसाच आमच्याकडे पाहत बसला. तास दोन तासात आम्हाला झोप लागली ,नंतर केव्हा तरी आमच्यापैकी एकाला जाग आली तेव्हा त्याने डोळे चोळून पाहिले तर तो वेडा आमच्या सगळ्यांच्या डोक्याजवळ येऊन शांतपणे बसला होता, तो एकटक आमच्याकडे पाहत होता .मग मात्र त्याने चुपचाप बाकीच्यांना जाग केलं आणि आम्ही सगळे सकाळी पर्यंतचा तसेच जागे होतो . बराच वेळ झाल्यानंतर तो वेडा मंदिराकडे जाऊन झोपला .सकाळ झाली तेव्हा आम्ही चहा केला आणि आम्ही होस्टेल ला परत निघालो.
मोहन मुठाळ
Comments