Casualty आणि बरंच काही


मुखशल्यशस्त्रक्रिया विभागात काम करत असताना बरेच वेळा casualty म्हणजे अपघात विभागात ड्युटी करायची संधी मिळायची .सुदैवाने किंवा दुर्दैवाने हे त्या त्या अनुभवावरून ठरायचं .रात्री-बेरात्री होणारे अपघात किंवा भांडण आणि यातून होणारे एकमेकांवरील हल्ले यामुळे चेहऱ्यावरती मार लागला की बहुतेक जण अपघात विभागात पहिल्यांदा येत .अशा वेळेस अपघात विभागाचा कॉल आला की आम्हाला तयार राहावे लागायचे .तशी म्हणता उपचाराची उत्तम सोय एवढ्या गंभीर जखमी अवस्थेत  रात्री आणि इतक्या कमी वेळात तिथे उपलब्ध नसायची ,परंतु वेळेवर प्रथम उपचार केले आणि निदान  केले तर रुग्णाला सकाळी उर्वरित उपचार लवकरात लवकर मिळू शके.बऱ्याच वेळी झोप लागल्यानंतर नेमके कॉल यायचे तेव्हा मात्र अपघात विभागाकडे जायला पाय उचलत नसत या उलट कितीतरी वेळा रात्रभर जागून काढली तरी अपघाताने ही एक कॉल येत नसे.असा हा अपघात विभाग .त्या विभागात इतरही शाखेचे डॉक्टर उपलब्ध असायचे म्हणजे मेडिसिन सर्जरी इत्यादी .बरेच वेळा जखम किंवा अपघात झालेली व्यक्ती एकटीच असायची किंवा अनेक वेळा समुहाने होणारे अपघात असायचे . उपचार सुरू करताना रुग्णाला शुद्धीवर असेल तर बरेच प्रश्न विचारून माहिती नोट्समध्ये टाकावी लागायची अनेक वेळा अर्धवट शुद्धीवर असल्याने किंवा संपूर्ण बेशुद्ध असल्यावरती आणि सोबत कोणी आलं असेल तर त्यालाच सगळे उपचार समजून सांगावे लागे आणि प्रश्न विचारावे लागायचे .महामार्गावर वरती झालेले रात्रीच्या वेळी झालेले अपघात किंवा शासकीय वाहनात म्हणजेच एसटी बसचे अपघात यामध्ये 50 ते 60 लोक अनेकदा जखमी व्हायचे ,तेव्हा मात्र अपघात विभाग खरे पाहता न पाहण्यासारखा असायचा .सर्वत्र रक्ताचे डाग , सुकलेल्या रक्ताचा घाण वास सहन करण्या पलीकडे असायचा .अशा वेळी तिथे एकही बेड रिकामे  नसायचे .एरवी नीरव शांतता असलेला अपघात विभाग त्यावेळेस रडण्याने ,दुखण्याने ,ओरडण्याच्या आवाजाने अधिक भरून यायचा. त्या वातावरणात काम करणं खरंच कठीण असायचं .एकदा तर एक कॉल आला ,आम्ही अपघात विभागाकडे निघालो तेव्हा दरवाज्याच्या बाहेर एक म्हातारी बाई लुगड नेसलेली ,एका नवजात लहान बाळाला मांडीवर घेऊन बसली होती .आत गेलो तर बघितले एका तरुण विवाहित महिलेला खालच्या जबड्याच्या वर आणि हातावर खोलवर मोठ्या जखमा झालेल्या होत्या ,तरीसुद्धा त्या अवस्थेत ती काहीही आवाज करीत नव्हती .बहुदा तिला मानसिक धक्का बसला असावा असे प्रथमतः वाटत होते .जबड्यावर जोरात तीक्ष्ण हत्याराचा मार लागल्याने खालच्या जबड्याचे दोन तुकडे झाले होते . तिला तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावे लागेल असेच वाटू लागले . अस असताना प्रथमोपचार करून नोट्स टाकताना आणि तिची तपासणी करताना तिथे उपस्थित असलेल्या एकाला विचारले .तो उत्तर देणार तेवढ्यात पाच ते दहा लोक एकत्र बाहेर जमले त्यांनी  पकडलं त्याला पकडलं असं म्हणून जोराने ओरड सुरू केली होती .म्हातारी बहुदा त्यातही शांतपणे बाळाला झोपी घालण्यात गुंग होती . बाजूला उभ्या असलेल्या एकाला विचारले काय झाले आणि कशामुळे झाले . तेव्हा तिचा तो भाऊ आहे  अस म्हणाला ,तिच्या नवऱ्याने दारू पिऊन घरात पैशासाठी वाद घातला आणि रागाच्या भरात दारूच्या नशेत कुऱ्हाडीने पहिला वारीच्या बायकोच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घातला .ती थोडक्यात बचावली म्हणून घाव मानेवर न लागता जबड्यात लागला .तरीही त्याने दुसरा वार हातावरती केला , अन घराबाहेर पळाला . बाहेरआमची आई हिच्या बाळाला घेऊन बसली आहे आईकडे आहे .मात्र आता गावाकडच्या लोकांनी त्याला पकडून दोरीने बांधून एका खोलीत ठेवला आहे . हे सगळं ऐकल्यावर योग्य त्या केस पेपर वरती नोट्स टाकून तिला पुढील चाचण्यांसाठी पाठवले .जाताना त्या बाळाला पाहताना उगाचच डोळ्यात पाणी आले .म्हातारी अगदी आताही शांत होती, दोन दिवसांनी तो रुग्ण वारला अशी बातमी कानावर आली .नंतर प्रत्येक कॉल नंतर  अपघात विभागात कडे चालत जाणारी पावलं त्यानंतर अधिकच जड होत गेली.

 दुसरी घटना म्हणजे एक मध्यमवयीन व्यक्ती जिच्या डोक्यावरती मार लागला आहे असा एक कॉल आला .बरं हे कॉल अटेंड करण्यासाठी ज्या डॉक्टरांना जायचं आहे त्या डॉक्टरांचे फोन नंबर ड्युटी लागल्यावर विभागात लिहून द्यावे लागायचे .ते नंबर सुरू असतील की नाही तो भाग वेगळाच ,मात्र लिस्टमध्ये नाव टाकायला बहुतेकजण नकार घंटाच लावायचे .काहीजणांना अपघात विभागाचे नाव घेताच चक्कर येत असे. तरीही पाच ते सहा जणांचे नाव त्यात नेहमी असावे लागायचे . कॉल आल्यावर विभागातील नर्स  पहिल्या नंबर वरती संपर्क करे ,बहुदा तिथल्या तो कॉल लागला नाही किंवा उचलला गेला नाही तर दुसरा नंबर फिरवला जाई . कधी कधी कॉल ला गेल्यावर ती फार काही नसायचे त्यामुळे झोप मोडली तरी काही खूप काही वाईट वाटत नसायचे .तर जेव्हा अपघात विभागात आल्यानंतर बेड वरच्या रुग्णाला विचारले की हा मार कशामुळे लागला तर तो सांगू लागला .बरं दिसायला तो माणूस अतिशय सद्गृहस्थ वाटत होता ,दारू पिऊन धिंगाणा करून, मारहाण करणाऱ्या जातीतला तो दिसत नव्हता .सोबत त्याच्या कडे असलेली बॅग कडे पाहून तो नुकताच बाहेर गावावरून आला असेल किंवा प्रवास करायला चालला असेल असंच वाटत होतं .सलाईन आणि कॉटन ने त्याच्या  चेहऱ्यावरचे रक्ताचे डाग पुसून झाल्यानंतर आणि त्याचा रक्तप्रवाह टाके देऊन थांबविला .नंतर त्याला प्रश्न विचारणे सुरु झाले कुणा सोबत भांडण झाले का? तर तो म्हणाला नाही सर मी रात्री उशिरा रेल्वेने स्टेशन वरती आलो . एक दोन ऑटो दूर उभे होते . त्यातल्या एकाला विचारले तर भाडे जास्त सांगून त्याने नाही म्हटले ,तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते . दुसरा सोबत भाव करून मी त्यात बसलो ,मात्र त्याने थोडी दूर गेल्यानंतर एक निर्जन रोड लागला आहे ,या रस्त्याने शॉर्टकट आहे असे तो म्हणू लागला आणि त्याने मिल्ट्री कॅन्टीन च्या मधल्या मार्गातून ऑटो काढला तर लवकर पोहोचू असं तो म्हणाला .पण कशाच काय साहेब  त्याने ऑटो थांबवला आणि सीट खाली ठेवलेला एक दगड माझ्या डोक्यात मारला .खिशातले थोडेसे पैसे हिसकावून  आणि माझा मोबाईल घेऊन  तो पळाला . मलमपट्टी संपत असताना मात्र मला माझ्या डोळ्यासमोर तो दगड आणि एक ऑटोरिक्षा दिसत होता .

मोहन मुठाळ
 

Comments

Popular Posts