Dental camps आणि पाहुणचार
सामाजिक दंत शास्त्र या विभागाची ड्युटी सगळ्यात निवांत असते असे कॉलेजमध्ये सगळे मानायचे .जागेच्या दृष्टीने छोटा विभाग असूनही येथे रुग्णांची कधीही गर्दी जाणवत नसायची, तसा हा विभाग मग रुग्ण आणि जागा कमी असल्यावर तीथे अर्थातच त्यामुळे काम देखील कमी असायचे. पण या विभागाचे काम सुरू व्हायचे ते एका पत्र पासूनच .जेव्हा एखादे मामाचे पत्र विभागात यायचे तेव्हा पूर्वनियोजित दंत तपासणी शिबिराचे आयोजन बहुदा ग्रामीण भागातील शाळेत व्हायचे . ज्या ठिकाणी उपचार आणि सल्ला मिळणे कठीण असायचे त्या ठिकाणी मोबाईल डेंटल व्हॅनद्वारे कॉलेजमधली तज्ञ मंडळी आपली सेवा द्यायचे .डिपार्टमेंट मध्ये ते मामाचे पत्र आले की मामा ची तयारी सुरू व्हायची .शिबिराची तारीख, वेळ, जागा पत्रात अगोदरच नमूद असायची .शिबिर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी मोबाईल डेंटल व्हॅन होती .मामा मग आवश्यक ते सगळं सामान वरच्या कपाटातून खाली व्हॅन पर्यंत न्यायचे .त्यामध्ये लहान मोठी दंत आरोग्य विषयी माहिती असलेली पोस्टर्स देखील असायची. शिबिराच्या दिवशी डिपार्टमेंटमध्ये मोजकी माणसं ठेवून बाकी सगळे मोबाईल व्हॅन मधून नियोजित वेळी पोहोचत असू .ग्रामीण भागात गेल्यावरती डॉक्टरांना तेही मोठ्या शहरातून आलेल्यांना वेगळी आदरयुक्त वागणूक मिळायची .एकदा असेच एक तपासणी शिबिराच्या वेळी ग्रामीण भागातील शाळेत गेलो होतो . गाडीतून उतरल्यावर शाळेच्या पटांगणात मुलं-मुली शाळेच्या कपड्यावर छान रीतीने शिस्तीत बसली होती असे दिसले. सकाळचे नऊ ची वेळ असेल ,त्यातील काही मुलं शाळेतील नव्हती मात्र दातांची तपासणी शाळेत होणार आहे म्हणून आजूबाजूची काही मुलं तिथे आली होती . काही लहान मुलामुलींना छान पैकी रंगबिरंगी कपडे घालून पावडर लाली लावून नीट नेटक्या वेण्या घालून सांगत बसलेले पाहतांना खूप छान वाटे .कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता त्या मुलांमध्ये एक कुतूहल असायचे .एखाद दुसरा मुलगा उगाच शांत बसलेला असायचा ,मात्र रडणारं कोणी नसायचं .मग मामांनी सोबत आणलेली पोस्टर शाळेच्या वर्गात एक एक करून लावायला सुरुवात केली .शिक्षक वर्गाने टेबल-खुर्ची चादर यांची अगोदर मांडणी करून ठेवलेली होती . टेबल खुर्ची ची योग्य रीतीने जुळवाजुळव करून मामांनी इतर तपासणीचे सामान टेबलावरती लावले .आमची तपासणी सुरू करण्याअगोदर मुलांना थोडेसे मार्गदर्शन करा अशी शिक्षकांची सूचना आली .मग आम्ही बाहेर बसलेल्या मुलांना निरोगी दातांचे सुवर्ण नियम सांगायला सुरुवात केली, ते त्यांना समजले की नाही विचारून आणि विद्यार्थ्यांकडून पुन्हा ते वदवून घेतले .तोपर्यंत शिक्षकांनी वर्ग आणि रोल नंबर प्रमाणे मुलांना तपासणीचे कागद दिले होते.मग वर्गशिक्षकांनी १-१ वर्गाला आत जायला सांगितले .मुलं वर्गाबाहेर शांतपणे रांगेत उभी राहिली, त्यानंतर एकेक विद्यार्थी आत येत असे आणि आम्ही त्याला तपासणी करून तपास झाल्यानंतर त्यांना एक टुथपेस्ट देखील देत होतो . सगळी मुलं-मुली जाम खुश झाली, त्यांच्या चेहऱ्यावरून ते ताबडतोब समजून येत होते .दंत तपासणी शिबीर संपल्यानंतर बराच वेळ शाळेतील भिंतींवर लिहिलेल्या सुविचार वाचण्यात मन गढून गेल होत .परत जाताना गावचे सरपंच यांनी घरी येण्याचं आमंत्रण दिल .आम्ही मोबाईल डेंटल व्हॅन ने जवळच असलेल्या त्यांच्या शेतातील घरात पोहोचलो . हात-पाय थंड विहिरी च्या पाण्याने धुतले .ओटीवर बाहेर छान पैकी रांगोळी काढलेल्या पाटांवरती आमची बसायची व्यवस्था केली होती .त्यानंतर थोड्याच वेळात गरमागरम रोडगे आणि बटाट्याची भाजी ,वरणाची वाटी घेऊन सरपंच बाहेर आले .सरपंच तुपाची धार प्रत्येकाच्या ताटात टाकत पुढे सरकत आणि डॉक्टर साहेब तुमच्या शहरातल्या तुपापेक्षा आमच्या गावरान तुपाची चव अस्सल आहे की नाही ते सांगा बर असं ते म्हणाले. त्या नंतर मात्र आम्हा सर्वांचे पोटभर जेवण झाले ,आम्ही सरपंचांना आदरातिथ्य निमित्ताने धन्यवाद दिला परत आम्ही आमच्या शहराकडे निघालो .
मोहन मुठाळ
Comments