Gathering च खूळ आणि खुळ्यांची gathering




 गॅदरिंग हा तसा प्रत्येक महाविद्यालयातील कोणत्याही विद्यार्थ्यांच्या मनातला आवडता असा कार्यक्रम असतो . त्याला हुशार ,अतिहुशार ,पास-नापास ,खुळे ,डोकेबाज हॉस्टेलाईट ,लोकलाईट ,सीनियर ज्युनिअर अशा कोणत्याही  लेबल पासून  दूर जाण्याचा काळ असतो . प्रत्येकाला आपापल्या परीने करमणूक करवून घेण्याचं ते हक्काचे व्यासपीठ असत.तसे ते आमच्या कॉलेजातही होत.पहिल्या वर्षाला आल्यानंतर घाबरत घाबरत  गॅदरिंग पाहण्यात खुपच मजा येत असे .लांबून दिसणारे सीनियर , त्यांचे ग्रुप, त्यांच्यामधील चढाओढ एकमेकांना चिडवणे सोबत मजा करणे  अशी सगळी सर्कस पाहायला खूप मजा येत असे .आमची गॅदरिंग साधारण सात ते आठ दिवस चालत असे मात्र त्याची तयारी चांगली महिनाभर चालत असे . त्यात मग कमिटी ही ठरवली जायची, त्या कमिटीमध्ये विविध सदस्यांची सगळ्या पदांवर नेमणूक चालू व्हायची .या कार्यक्रमात संगीत खुर्ची ,रांगोळी स्पर्धा अंताक्षरी स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ,फेस पेंटिंग इत्यादी प्रकारच्या कल्पक गोष्टी असायच्या. गॅदरिंगचे सातही दिवस प्रत्येक दिवशी एका विशिष्ट दिवस साजरा करून अजून मजा आणल्या जात होती . ट्रॅडिशनल डे , कल्चरल डे ,टाय डे ,चॉकोलेट डे या प्रकारच्या विविध कल्पना तिथे प्रत्यक्षात उतरवल्या जायच्या .मग ट्रॅडिशनल डे च्या दिवशी सगळे सिनियर ज्युनिअर मुलं  कुर्ता पैजामा घालायची आणि सगळ्या मुली रंगीबेरंगी साड्या घालायच्या. कुणाकडे तसं नसेल तर कुठूनही मॅनेज करून आणायचे .अशावेळी कुर्ता एका मापाचा आणि पॅंट दुसऱ्या मापाची असंही कधी व्हायचं ,त्याची फिकीर नव्हती .फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये तर काहीजण  पौराणिक मालिकेतील एखादं पात्र साकारत सगळ्या कॉलेजमध्ये फिरत धमाल उडवायचे .काही प्रसिद्ध असलेल्या जोड्या  या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकार करायच्या ,तर काही जण इतिहास कालीन थोर महान वीर पुरुषांची वेशभूषा देखील करायचे .त्यांच्यासोबत अख्या कॉलेजमध्ये फिरताना फोटो काढताना खूपच मजा यायची. त्यानंतर चॉकलेट डे सारखा दिवस देखील कॉलेजमध्ये साजरा होत असे .गॅदरिंग च्या दरम्यान आंबट गोड  चॉकलेटच्या चवी प्रमाणे  आपल्या आवडत्या किंवा नावडत्या सिनियर किंवा ज्युनिअर ला चॉकलेट सोबतच तसेच भन्नाट संदेश लिहून देण्यात खरी मजा होती .मनात खोलवर ठेवलेला बऱ्याच गोष्टी या दरम्यान वरती यायच्या . एक प्रकारे भावनांचे आणि विचारांचे आदान-प्रदान होण्याचे साधन होते.

 अशीही गॅदरिंग करताना बऱ्याच गोष्टी मनासारख्या व्हायच्या तर कधी मनासारखं होत नसायचं मात्र मनासारख्या झाल्या नाही तर यांच्या दुःख या काळात जाणवत नसायच इतके हे वातावरण भारावून टाकणारं होतं .यात होणारया क्रीडा स्पर्धा क्रिकेट, कॅरम ,टेबल टेनिस देखील होत होत्या .त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने पडणाऱ्या आणि मुद्दाम एकत्र खेळणाच्या हेतूने  टीम तयार व्हायच्या. खेळताना हार-जीत याकडे लक्ष न देता टीमवर्क  कडेच अधिक लक्ष लागायचं ,ह्यामुळे  पुढे गॅदरिंग संपल तरी काही टीम कार्यान्वित  राहत असत. रात्रीभर चालणारया स्पर्धेसाठी कॉमन रूम मध्ये टीव्ही सुरू असतांना होणारी धमाल खरच पाहण्यालायक होती. नेहमी ज्युनिअर मुलांकडे बारीक लक्ष ठेवणारे सीनियर या काळात मात्र जूनियर मुलांकडे तेवढे लक्ष देत नसत .लक्ष असायचं मात्र मुलांकडे नव्हे . त्यामुळे ज्युनिअर मुलांमधील सुप्त आणि लुप्त गुण देखील वेळ प्रसंगी बाटली बाहेर पडत. या स्पर्धेमध्ये लवलेटर नावाची स्पर्धा ही देखील व्हायची. प्रेम पत्र कसे लिहावे याचे प्रशिक्षण बहुदा इथूनच सुरू झाले असावे. आपल्या प्रेमाचा रंग प्रत्यक्ष खुलत आहे की  नाही याची चिंता येथे नसायची मात्र आपल्या प्रेमपत्राचा रंग मात्र नजरेट भरला पाहिजे आणि निदान त्यात तरी आपला नंबर आला पाहिजे अशी शिकवण इथेच भेटली. त्यातही गॅदरिंग साठी स्पॉन्सरशिप मागायची तर त्यासाठी मुला-मुलींचा ग्रूप करून स्वारी हॉस्टेलवरून सायंकाळी निघायची .गुलमंडी, निराला बाजार,औरंगपुरा यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी मग ही पायपीट सुरु व्हायची. ही पायपीट जास्त झाली तरी त्याच दुःख नसायचं .मग थोडसं थकून भागून झालं तर मुला-मुलींना एकत्र कुठेतरी आईस क्रीम किंवा पाणीपुरी खाताना गप्पा मारताना जी मजा यायची त्यामुळे पायातल त्राण निघून जायच. एकदा तर आम्ही काही मुलं-मुली एकदा गुलमंडी मध्ये फीरून बराच वेळ झाला, त्यामुळे मुलींनी तहान लागली असे म्हटले आणि आपल्या सगळ्यांच्या गळ्याच्या खाली काहीतरी उतरावे असा आम्ही विचार करू लागलो .मग आम्ही पाच-सहा जण तिथे एका बाजूला असलेल्या फेमस ज्युस सेंटर वरती  ज्यूस प्यायला गेलो .तिथे बसतांना ज्युस सेंटर च्या मेनू कार्ड कडे  आणि किमतीकडे लक्षण कोणाचच नव्हतं. आम्ही सगळ्यांसाठी ज्यूस ऑर्डर केला थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि बाहेर निघालो .आता जाताना बिल पाहून  सगळ्यांना प्रश्नच पडला. मात्र मुली सोबत असतांना  पैशाचा प्रश्न पडावा हे म्हणजे मुलांच्या इज्जतीचा फालुदा काढण्या सारख होत . अशामध्ये एकाने स्वयंस्फूर्तीने मोठ्या मनाने आणि मोठ्या खिशाने पाचशे रुपयांची एक नोट त्या ज्युस वाल्या कडे दिली .त्याने उरलेले पैसे दिले. थोड्या वेळानंतर मुली एका दुकानात पुढे गेल्यानंतर दानशूर  मुलगा बाकीच्या मुलांना तुम्ही तुमच्या ज्युस चे तरी पैसे परत द्या  असं म्हणत होता .बाकीची मुलं मात्र हसून हसून पार रस्त्यावर पडायची बाकी होती .गॅदरिंग  मुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या . एरवी होस्टेलमध्ये  कधीच आपली सावली सुद्धा  न पडू देणारे अनेक सिद्धहस्त पुरुष गॅदरिंग वेळी मात्र एका क्षणात तिथे साक्षात्कार देत आणि अंतर्धान पावत. होस्टेलला तुम्ही राहत का नाही किंवा हॉस्टेल ला बाहेरच्या रूम वरून आल्यावर तू कुठे राहतो असं विचारलं तर मी माझ्या ताईकडे राहतो असे म्हणणारे एकुलते एक पोरही  आम्हाला या गॅदरिंग मध्ये सापडले.  अशा बऱ्याच गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त गॅदरिंग मध्ये अनुभवास आल्या  . सध्यातरी इतकेच...

मोहन मुठाळ
Timed Pop-up Widget Sidebar

Need help?

Chat with us on WhatsApp!

Start Chat

Comments

Popular Posts