Juniors आणि Seniors
क्योंकी सिनियर भी कभी ज्युनियर थे .....! दंत वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षाला आलेले मुलंमुली ज्युनिअर. तसंच दुसऱ्या वर्षातील मुलं मुली पण तिसऱ्या वर्षासाठी ज्युनिअरच, ती एक वर्ष अधिक झाल म्हणून काय झालं ? खरं पहाता तिसऱ्या वर्षातील मुलमुली हेदेखील चौथ्या वर्षातील मुलांना जुनियरच ,दोन अधिक वर्षे झाली म्हणून काय झालं आणि मग चौथ्या वर्षाची मुलं ही पास होऊन नंतर आंतरवासीता झालेल्या लोकांना ज्युनिअर . असं सगळं सरळ साधं गणित असताना त्यात विचित्रपणा असा का ?
मात्र ही विभागणी केवळ आणि केवळ पास नापास परीक्षेच्या भरवशावर ठरवलेली असते असं कुणाला वाटलं तरीही ते शंभर टक्के खरं आहे अस नाहीच.वेळोवेळी नापास होऊन बराच काळ एकाच वर्षात दिवे लावलेले प्रभावी व्यक्तिमत्व आणि वर्षानुवर्षे ज्युनिअर वर एकाच वर्गात राज करणारे सम्राट हे सुध्दा नवीन पास होऊन आलेल्या मुलांसोबत एकाच वर्गात राहत असले तरीही तेच सीनियर असा काय तो नियम ! पहिल्या वर्षाला आलेली ज्युनियर तीदेखील सगळी सारखी नाहीत ,त्यात अजूनही गुंतागुंत .मोठंमोठी राज्य प्रशासनाच्या दृष्टीने विभागस्तरीय रचना का करतात त्याचं हे उत्तर . म्हणजे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र .आता विदर्भातील पहिल्या वर्षातील विद्यार्थी याची दुरावस्था दिवसातून प्रत्येक प्रहरी बदलणारी. तीच अवस्था मराठवाड्यातील आणि उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची देखील. म्हणजे विदर्भाचा सीनियर समोर आला तर वेगळी ,मराठवाड्याचा सीनियर आला तर वेगळी आणि उर्वरित महाराष्ट्राच्या पैकी कोणी आला तर त्याची परिस्थिती वेगळी .किती अवघड अशी ही व्यवस्था ! बर विदर्भाचा विद्यार्थी विदर्भात शिकत असेल तर त्याची अवस्था निराळी ,तोच विदर्भाचा विद्यार्थी मराठवाड्यात शिकत असेल तर आणि तोच जर विद्यार्थी उर्वरित महाराष्ट्रात शिकत असेल तर किती निराळी ! अशा प्रकारे विविध अनुभवाची गाठोडी या निमित्ताने बांधल्या जाते . या आणी बाणी च्या प्रसंगी काही हुशार ज्युनिअर आपलं कर्तृत्व सिनियर ला दाखवून द्यायची.कारण सिनियर असला तरी तो ज्युनिअर पेक्षा हुशार असेल याची काय शाश्वती ? खरं बोलण्याची सवय असणारी मुलं मात्र वेळी अवघडलेल्या अवस्थेत असायची, खोट बोलता येत नसे तर काय करणार ?
काही ज्युनिअर दिवसाढवळ्या स्वच्छ अशा सूर्य प्रकाशात तर अशी बनवाबनवी करायची की त्याला तोड नसायची .म्हणजे लातूरचा कुणी सीनियर समोर आला आणि त्याने विचारलं तुझं गाव कोणत आहे तर माझं गाव लातूर आहे असं सांगायचे म्हणजे तेवढाच सीनियर च्या मनात सॉफ्ट कॉर्नर तयार व्हायचा किंवा लगेचच थोड्या वेळा नंतर दुसरा कोणी सीनियर भेटला आणि उस्मानाबादचा तो असेल आणि त्याने विचारलं तुझं गाव कोणतं तर त्याला माझं गाव उस्मानाबाद आहे असं सांगणारे .म्हणजे यालाच अक्कलहुषारी म्हणतात अस बऱ्याच ज्युनिअर ला वर्षाचा आणि त्यांचा निकाल लागेपर्यंत काही लक्षात येत नसे .
सीनियर ज्युनियर यांची ही अशी विभाग स्तरावरची रचना कशासाठी तर पिण्याचे पाणी बॉटल मध्ये रूमवरती आणून देण्यासाठी ? हॉस्टेल ला रूम मध्ये पार्टी सुरू असताना बाहेर पार्सल आणायला कोण जाणार यासाठी ? सगळीच मंडळी या सिनियर ज्युनिअर नात्याच्या घनघोर वावटळीत फसते असे नाही .स्वतःच्या गावच्या किंवा विभागीय स्तरावर चा सीनियर जुनियर नसलेला म्हणजे याचा अर्थ त्या महाभागाने मागच्या जन्मात घोर पाप केले असणार त्याचेच हे निष्पत्ती असं तो मनाला निक्षून पटवून देणारा व्यक्ती .ह्यांची नेहमी अपक्ष उमेदवारासारखी परिस्थिती असायची. पाठिंबा कोणाला देताही येत नसे तसेच कुणालाही पाठिंबा मागताही येत नसे.
तर गावाकडून ज्युनिअर आल्यावरती सोबत आणलेल्या शिदोरीवर किंवा मोठ्या शहरातून ज्युनिअर आलेला असेल तर त्या ज्युनिअरच्या खाऊत पहिला हक्क मागणारे हे सीनियर आपापल्या विभागातीलच. दुसऱ्या विभागातील सिनियर याना आंतर विभागीय मेजवानी सहसा मिळत नसे ,त्यासाठी दोन्ही कडून पूर्वी कधी कठीण प्रसंगी बलिदान केल्याची हिस्ट्री असेल किंवा खूप जास्त आवडता सिनियर-ज्युनिअर असेल तर ही शक्यता असायची .बरं विश्वासार्हता दाखवण्यासाठी ही विभागस्तरीय रचना केली असेल तर शपथ ! म्हणजे एका मराठवाड्यातील सीनियर ने विदर्भातील जूनियर ला पाण्याची बॉटल भरून आणायला सांगितल्या वर अविश्वासाने प्रथम त्यालाच पाणी प्यायला लावून पाण्याची आणि ते भरून आणणाऱ्या ज्युनिअर ची ही विश्वासार्हता तपासण्याची सिनियर साठी एक कन्फमॅटोरी टेस्ट होती .बऱ्याच वेळी याचा फायदा असा होत असे ,एकाच विभागातील जूनियर यांना सीनियर कडून बरेच काही पुस्तके मिळायची. ही एक चांगली गोष्ट असायची ,पूर्वापार चालत आलेल्या सिनियर ज्युनिअर च्या रूढी परंपरेचे पालन करण्याची ही जबाबदारी एका अर्थाने त्या पुस्तकाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला प्राप्त व्हायची .त्या वर्षानुवर्षे फिरत असलेल्या त्या पुस्तकांच्या आत बरेचदा अभ्यासाव्यतिरिक्त काही कलाकुसरी म्हणजे सिनिअरनी लिहिलेल्या कविता किंवा त्यांनी रेखाटलेली चित्रे तर कधीकधी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे देखील असायची . काही सीनियर जे वर्षभर काम सांगत असे ते तपस्वी मुनीगुण अंगी प्रचंड दैवीशक्ती बाळगून असायचे . ती सिनियर मंडळी परीक्षेच्या आदल्या दिवशी ज्युनिअर ला रूम मध्ये बोलावून उद्या बरोबर कोणते प्रश्न परीक्षेत येतील याचा अंदाज म्हणावा की भविष्य सांगत. त्यांच्या तोंडून निघालेली प्रत्येक आकाशवाणी ही बऱ्याच जूनियरना काठावर पास करून सोडत होती .बुडत्याला काडीचा आधार अशी ती अवस्था असायची .अशी ही गुरू-शिष्य परंपरेतील एक सुवर्ण अध्यायाची ची आठवण होती .
मोहन मुठाळ
Comments