Library आणि रीडिंग रूम
दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला आल्यानंतर सर्वप्रथम ओळख होणारी गोष्ट म्हणजे लायब्ररी आणि रीडींग रूम ,अभ्यासाच्या दृष्टीने नाही .मात्र इतर कोणत्याही विभागात प्रवेश करण्यापूर्वी लायब्ररीची ओळख होते ती लायब्ररी कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड च्या निमित्ताने .छान पैकी मोठमोठाली चौकोनी किंवा आयताकृती असलेली लाकडी लांबच लांब टेबल आणि त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे साथ देणाऱ्या फोमच्या खुर्च्या . लायब्ररीमध्ये लागलेली मागील किंवा येणाऱ्या गॅदरिंगची पोस्टर किंवा एखाद्या सीनियर ने पदव्युत्तर परीक्षेत देशपातळीवर क्रमांक काढल्या नंतर लावलेली अभिनंदन पत्रके .लांबच लांब असलेल्या पुस्तकांनी भरलेल्या कपाटांची कानाला कान लावून उभी व्यवस्था .त्यात काम करणारे लायब्ररियन आणि मामा. इतर कोणत्याही ठिकाणी नसलेली शांतता.
प्रथम वर्षाला आल्यानंतर लायब्रेरी मध्ये प्रवेश मिळत असे तर फक्त कार्ड तयार करण्या साठीच . नंतर सीनियर असताना लायब्ररीमध्ये येऊन जूनियर ने अभ्यास करणे म्हणजे घोर पाप होते. त्यातही सीनियर कडे तोंड करून बसणे त्यांच्यालेखी म्हणजे मोठा क्रांतिकारी उठाव असायचा .ज्युनियर ने बसायचं जरी असलं तर कुठेतरी कोपऱ्यात बसून आणि भिंतीकडे तोंड करून नाहीतच सीनियर कडे पाठ करून बसणे हा जसा विधिलिखित नियम असायचा .बरं त्यातही लायब्ररीमध्ये जूनियर ने एकट यायचं तर फार मोठी समस्या असे ,म्हणून दोन तीन जणांच्या कळपामध्ये या लायब्ररीमध्ये अग्नी प्रवेश करून लगेचच बाहेरचा रस्ता पकडणे यातच जूनियर ची भलाई असायची .बर या लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसणारी मंडळी ही पण एक अभ्यासाचा विषय असे ,म्हणजे आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासाचा नव्हे तर या विद्यापीठाच्या अंतर्गत इतर शैक्षणिक कार्यक्रमांच्या अभ्यास क्रमातील .कोण किती वेळ कुणासोबत रीडींग रूम मध्ये बसले होते, कोण किती वेळ कोणतं पुस्तक वाचत होत, कोणी कोणाला कशासाठी पुस्तक दिलं किंवा कुणाच्या कार्ड वरती कुणी पुस्तक उधार घेतलं अशा अनेक विषयांचा वर्षानुवर्ष अभ्यास करणारी उच्चस्तरीय समिती येथे नेहमी आसनस्थ असे .या समितीच्या सदस्यांचा अभ्यासाशी तसा संबंध फक्त अभ्यासक समिती वरती नेमणूक एवढाच असे.
तर अशीही लायब्ररी सुरू होण्याचा वेळ म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. सकाळी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून छान पैकी तयार होऊन बैग मधे मोठी पुस्तके टाकून बूट पालिश करून लायब्रेरी मधील आवडती खुर्ची पटकवून मग पुस्तक टेबलावरती उघडून अभ्यासाची सुरुवात न करता बरेच जण मंगेश चे पोहे किंवा अन्नाच्या कॅन्टीन कडे प्रस्थान करत .बऱ्याच जणांची सुरुवात दिवसाची लायब्ररी पासून होत असे ती अशी. बरं लायब्ररीच्या आत अभ्यास करताना कधीतरी बाहेर चहा प्यायला जाणारी मंडळी असो किंवा नेहमीबाहेर फिरत असलेली पण कधीतरी अभ्यास करायला आत लायब्ररीत येणारी मंडळी असो अशा सर्वांनाच लायब्रेरी ने आपले मानले होते. दैनंदिन कार्यकाळात जूनियर ला प्रवेशपरवानगी क्वचितच असणारी मात्र प्रीपेरेटरी लीव मध्ये मोकळ्या मनाने सीनियर जूनियर ला सामावून घेत असे .त्यात लायब्ररी जवळ असलेल्या वॉटर कुलर जवळ उभे राहून गप्पा मारण्यात काही मंडळी इतकी तरबेज होती की त्यांच्यातील संवादाला अक्षराची गरज भासत नसे .मूक भाषेत जितकाअर्थ निघत नसायचा त्या पेक्षा जास्त येथे होणाऱ्या मूकसंभाषणात निघे .वाटर कूलर तसा अनेक मुकयाना मुक़साक्षी होता . तर कधी कधी तहान न लागता ही केवळ कुणाची तरी नजर भेट व्हावी या उद्देश्यने वॉटर कूलर च्या स्थळाची निवड होत असे .भर दुपारी भरलेल्या रीडिंग रूम मधून एखादा विद्यार्थि किंवा एखादी विद्यार्थिनी खुर्चीवरून उठून बाहेर गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एखाद्यानेे जाणे यातून त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधंची ओळख जगाला नकळतपणे होत असे, मात्र अभ्यासाची वेळ असल्याने बरेच सीनियर याकडे लक्ष पूर्वक दुर्लक्ष करत.
अगोदर ही लायब्ररी महाविद्यालयाच्या वेळेतच सुरू असे मात्र त्यातील काही सिनिअर मंडळींनी अभ्यास करण्यासाठी ती रात्रीही सुरू करावी असा निश्चय करून ती गोष्ट प्रत्यक्ष वास्तवात देखील आणली होती .त्यातील बरेच सीनियर मग पुढे पदव्युत्तर परीक्षेत देशपातळीवर झळकले देखील होते .त्यामुळे जूनियर चा मार्ग एकदम सुकर झाला होता .रात्रीच्या वेळी सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करायला हक्काची जागा म्हणजे ही रीडींग रूम होती. रात्रीच्या वेळी साधारणतः आठ वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये गर्दी असायची नंतर मात्र रात्र पाळी वर कौशल्यप्राप्त केलेले निशाचर प्राणी नऊ वाजता रीडींग रूम मध्ये एकमेकांना सूर्यनमस्कार करत .दोन्हीप्रकारच्या प्राणिमात्रांना ही योग्य गोष्ट होती.अशावेळी रात्री अभ्यास करणारी, अभ्यास करून न देणारी आणि casualty मध्ये ड्युटी लागलेली काही मंडळी रात्रभर भुतावळ सारखी बसून किंवा झोपुन असायची .लायब्ररीची रीडींग रूम चे आंतर हॉस्टेल पेक्षा कमी होते त्यामुळे हॉस्टेल वरून रात्री इमर्जन्सी कॉल आल्यावर येण्यापेक्षा रीडींग रूम मधून लवकर जाणे होत असे .रात्रीच्या वेळी बाहेर दरवाजाजवळ म्हणायला एक सेक्युरिटी नियुक्त करण्यात आलेला असायचा, मात्र त्याचाही वेळ मुलांसोबत च्या गप्पा ऐकताना जात असे .बहुतेक करून शॉर्ट सर्व्हिस कमिशन ची ड्यूटी संपलेली आणि रिटायर झालेली ही मंडळी तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून असे.
अशा वेळेस लायब्ररी पासून बऱ्याच अंतरावर एक पाण्याची मोठी टाकी देखील होती .संपूर्ण बिल्डिंगचा पाणीपुरवठा तेथूनच व्हायचा .कधी कधी वाटर कुलर मध्ये पाणी संपलं की तिकडे पाणी घ्यायला जायला होत असे, तेथे आजूबाजूची संपूर्ण लाईट रात्रीच्या वेळी बंद असल्यामुळे दुरुन रीडिंग रूम चा थोडासा प्रकाश टाकणारा कॉरिडॉर म्हणजे स्वर्गाचे दार असे दिसत असे .अंधारात पाणी भरतांना तिथे खूप भीती वाटायची. बऱ्याच सीनियर ना तिथे कुणीतरी पाणी भरताना , कोणतेतरी चित्रविचित्र आवाज ऐकण्याचे भास देखील होत होते .कॉलेजमध्ये बरेच वेळा मुलं आणि मुली एकत्र बसून अभ्यास करत .काही मुलांना मात्र हे कौशल्य प्राप्त करण्याची संधी तपश्चर्या करुनही होत नसे मग अशावेळी आपल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मुला-मुलींच्या एकत्रित बसलेल्या अभ्यास करणाऱ्या ग्रुपला विसर्जित करण्यासाठी त्या पाण्याच्या टाकीच्या भुताचा आवाजाचा आधार घेतला जाई. असा आवाज ऐकून मुला-मुलींची सुरु असलेली सामूहिक चर्चा आणि अभ्यासगट स्थगित केली जाई आणि मुलींना होस्टेलवर वेळेच्या अगोदर सुखरूप पोहोचवण्याचे काम हे भूत नकळतपणे करत असे. तर अशी ही लायब्ररी आणि अशी ही रीडींग रूम.
मोहन मुठाळ
Comments