Mess म्हणजे मेस असते , तुमची आमची Same नसते
मेस म्हणजे जाड़ बारीक, काळा गोरा, श्रीमंत गरीब ,ढ हुशार , पास नापास ,गावाकडचा किंवा शहरातील असा कुठलाही भेदाभेद न ठेवनारी जागा . कशासाठी पोटासाठी या साध्या विचारावर आधारित सगळ्यात मोठा प्रश्न बाहेर शिकत असताना असतो तो उदर भरण कर्माचा .चांगलं ,रोज ,घरगुती, पौष्टिक ,चविष्ट नसल तरी निदान ताज आणि मोजक इतकी महत्वकांक्षा पोटाशी धरुन बरेच विद्यार्थी मेस च्या डब्ब्यात किंवा ताटात हात घालतात .हा हात घालावाच लागे कारण बाहेर धाब्यावरती किंवा हॉटेल वरती विशेष उल्लेखनीय चर्चासत्र याचा अपवाद सोडला तर दोन घास सोडाच पन पाणीदेखील खूप महाग असायचं आणि ते लांब देखील असायचं . तशा कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये आणि या दोघांच्या बाहेर अशा बऱ्याचशा मेस होत्या .
एकाच वर्गातले मुलं एकत्र मिळून मेस चालवत असत .यासाठी रूम भाड्याने घेणे , भाजीबाजारातून बाजार आणणे, पैसे गोळा करणे ,मागचा-पुढचा हिशोब ठेवणे अशी कामे ही मुलं एकमेकांमध्ये वाटून घेत आणि स्वयपाक करण्या करीता आणि भांडी घासुन पुसून स्वच्छ करायला बाई पगार देऊन नेमून घेत असत. यात फायदा असे की जे पाहिजे ते स्वतः आणता येईल आणि तयार करून खाता येई. इतर मेस प्रमाणे जे डब्यात किंवा ताटात आहे तेच हातातोंडाची सवय असल्याप्रमाणे खात राहणे असे इथे होत नसे .इकडे मात्र स्वतःचा मेनू स्वतः ठरवण्याचा अधिकार असायचा. या मेसच्या मतदार संघात सार्वत्रिक निवडणुका प्रमाणे मेथी पालक या सारखे हिरवेगार उमेदवार जेव्हा मनात आणलं तेव्हा आपल्या मतदारसंघात विकत घेता येत असत किंवा वांगी टमाटे यासारख्या नावडत्या उमेदवाराला राजकारण आणि समाज कारण करून संधी नाकारता येत असे .कधी कधी अपक्षा सारखी अवस्था असलेला सोयाबीन वडाच्या भाजीला मात्र या बाहेरच्या मेस या मतदारसंघात पाठिंबा खूप कमी असे .मात्र व्हेज आणि नॉनव्हेज या दोघांचीही चव नसणाऱ्या पण तशाच दिसणाऱ्या भाजी ची गंमत की प्रत्येक मेस मध्ये सारखीच.
कॉलेजमध्ये तशा बऱ्याच मेस होत्या .दुपारच्या जेवणाच्या वेळेत म्हणजे साडेबारा ते दीड च्या दरम्यान भल्यामोठ्या डब्यांच्या पिशव्या घेऊन एक मेसवाले काका यायचे .प्रत्येक टप्प्यावरती निळ्या रंगाची खून असलेले आणि त्यावर पांढर्या रंगाने आकडे लिहिलेले डब्बे म्हणजे उदरभरणाची अक्षय पात्र होते . पोळीभाजी ,वरण भात, आणि महिन्यात एकदा नॉनव्हेज किंवा गोड जेवनाची फीस्ट या डब्यांमध्ये असायची . कधीही कोणीही कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहू नये या साध्या तत्त्वावर चालणारी ही मेस पैसे कोणत्याही तारखेला आले तरीही डबा न चुकणारी मेस होती . पैशासाठी या काकांनी कधीही कोणत्याही विद्यार्थ्याला सुनावले किंवा बोललेले ऐकीवात नाहीच .डबा खाऊन झाल्यावर ज्या ठिकाणी ठेवला असेल तिथे जाऊन उचलून आणणे यातही कधीही त्यांनी कोणाशी वाद घातला नाही . काही विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर परीक्षेचा अभ्यास करत असताना मेसचे उरलेले पैसे पदव्युत्तर परीक्षेत देशव्यापी पातळीवर क्रमांक काढून मग कॉलेजमध्ये आल्यावरती आठवणीने परत त्यांना दिलले आहेत .मुलांच्या शिक्षणात आणि उदर भरण्यात याचा खारीचा वाटा आहे . मुलांना परीक्षेच्या वेळी देखील कामाला येत असे .इतर वेळी फक्त वेळ घालवण्यासाठी केला जाणारा नाष्टा परीक्षेच्या वेळी मात्र विद्यार्थ्यांकडून हमखासपणे विसरला जात असे किंवा टाळला जात असे .अशा वेळी हे मेस वाले काका न चुकता परीक्षेच्या वेळी होस्टेल ला सकाळी सकाळी शिरा उपमा पोहे रूमवरती आणून देत. ते खाऊन मग विद्यार्थी निवांतपणे परीक्षा द्यायला मोकळे होत असत.
उलट पक्षी अजून एक मेस होती .कड़क नियम असलेली . नियम म्हणजे नियम. ज्या तारखेला महिना संपला त्या तारखेला किंवा त्याच्या एक दिवस अगोदर शांतपणे उद्या डब्बा पाठवायचा का नाही अशी प्रेमळ वजा सुचना आणि इशारा करणारी मेस. इतर मेससारखे नियम ढाब्यावर बसवता न येणारी मेस . डब्बा जिथे खाल्लात त्या जागी न ठेवता व्यवस्थित जागेवर आणून ठेवला तरच दुसऱ्या दिवशी चा डब्बा तुम्हाला व्यवस्थित भेटायचा. नाहीतर डब्बा भेटण्या अगोदर अर्धा तास उपशिपोटी भाषण सहन कराव लागत असे . नियम म्हणजे नियम .कोणताही आनंदाचा प्रसंग असेल तरीही फिस्ट मधून जास्तीत जास्त गोड जेवण मात्र नॉनव्हेज कधीही नाही हा देखील नियमच. अशा काही नियम धाब्यावरती बसवलेल्या मेस तर काही नियम डब्ब्यावरती लिहिलेल्या या मेस आमच्या कॉलेजमध्ये होत्या .
बरेचदा काही मेस मध्ये जाऊन जेवण करता यायचं . कारण ताटामध्ये जेवण करणे आणि एकाच आकाराच्या गोल एकावर एक ठेवलेल्या डब्यांमध्ये जेवण करणे आणि ताट मधे जेवण करने वेगळे. डब्यात आवडता पदार्थ अनेक जणांमध्ये वाटला जाई तशा प्रकार ताटात फार कमी होत असे .डब्यात एकदा भरलेला पदार्थ आवडत नसला तर तो तसाच ठेवला जात, असे परिणामी तो वाया जाई. ताटात मात्र वाढताना तस होत नसे ,जे पाहिजे तेच वाढले जाई.बेगमपुरा मध्ये किंवा जुबली पार्क जवळ तशा बर्याच मेस होत्या.होस्टल ला रूमच्या बाहेर डबा एरवी तसा राहिला तरी काही फरक पडत नसे .रूम मधील विद्यार्थी असो वा नसो काही फरक पडत नसे .मात्र ज्या दिवशी फिस्ट म्हणजेच अंडाकरी किंवा नॉनव्हेज किंवा जिलेबी गुलाब जामुन चा डब्बा येत असे तेव्हा मात्र तो डब्बा पहारा देऊन सांभाळ करावा लागे . अर्थात तरीही रूम मधल्या बेसावध विद्यार्थ्यांची नजर चुकवून अशा डब्बा गुप्त आणि निर्जन स्थळी नेला जाईल तिथे बसून ताव मारल्या नंतर चुपचाप डबा परत जागेवर ठेवला जाई. अशा वेळी रूम मधे निवांत असलेल्या ला एकादशी ठेवावी लागे . कारण फिस्ट च्या दिवशी रात्री मेस ला सुट्टी असे . बरेच वेळा बाथरूम मधे आंघोळ अर्धवट सोडून रूम च्या दरवाज्यावर धावत याव लागे .अशा या आमच्या मेस !
मोहन मुठाळ
Comments