Sofa set आणि सफारी सूट



मुंबई येथे दंतवैद्यकीय प्रशिक्षण घेत असताना वेगवेगळ्या विभागात काम करायला मिळाले .त्यावेळेस दंत व्यंगोपचार  विभागात काम करताना लक्षात आलेली ही गोष्ट .बहुधा पहिला दिवस होता .एक रुग्ण त्याचा केस पेपर घेऊन माझ्या टेबलापाशी पर्यंत पोहोचला .त्यावरील उपचारासाठी तारीख आजची जरी होती तरी तो केस पेपर काढण्याची तारीख बघितली तर ती दोन वर्षांपूर्वीची होती .लिहितांना काहीतरी चूक झाली असे मला वाटले मग त्याकडे दुर्लक्ष करून तिथे सुचवलेले उपचार सुरू केले .दुसऱ्या दिवशी पुन्हा एका पेशंटचे तसंच ,केस पेपर २ वर्षांपूर्वी चा होता .त्याच्यासोबत त्याची आई होती .त्या दोघांना विचारले ,यावरची तारीख दोन वर्षांपूर्वीची आहे .त्यावर त्या रुग्णाची आई म्हणाली सर ही तारीख बरोबरच आहे मात्र आज उपचाराची तारीख घ्यायला दोन वर्षांपूर्वी आम्ही आलो होतो ,तेव्हा जी ट्रीटमेंट सांगितली ती सुरू करायला २ वर्षाचा वेळ अजून आहे असं आम्हाला सांगितलं गेलं होत . आता ती सुरू करायची आहे. मग मात्र मला त्याचे आश्चर्य वाटले ,दोन वर्ष कागद जपून, तारीख ,वेळ लक्षात ठेवून घ्यायचं म्हणजे कमाल नाय काय ? रुग्णांची उपचाराबद्दल ची असलेली जाणीव आणि त्याचे महत्त्व अशा वेळेस लक्षात यायचं. काही रुग्ण तर मुंबईला सकाळी पोहोचण्यासाठी नांदेड वरून रात्री रेल्वेत बसून निघायचे आणि सकाळी नऊ वाजता फक्त दहा मिनिटाच्या उपचारासाठी एवढ्या लांबून प्रवास करून येत. आश्चर्य वाटले तरी यामागे कारण तशी बरी होती. मात्र कुटुंबाचा आर्थिक भार कमी करणे हे देखील प्रमुख कारण असायचं . खाजगीमध्ये दंत उपचाराचा खर्च रुग्णांना किती लांब जायला शिकवतो याची समज केव्हा आली.

 मुंबई येथे काम करीत असतानाच विशेष उपचार विभागात काम करत असतानाचा हा दुसरा अनुभव. तसा तो  विभाग विषेश लोकांवर उपचार करण्यासाठी होता क तिथे साधारण रुग्णांना परवानगीशिवाय उपचारास मुभा नव्हती. विशेष किंवा अतिविशेष व्यक्तींसाठी तो विभाग सज्ज नेहमी ठेवला जात असे .त्यात मंत्रालयातील मंत्री ,उच्च पदस्थ अधिकारी ,मंत्रालयातील कर्मचारी यांना विशेष प्राथमिकता दिली जाई. इतर भागाप्रमाणे या विभागाच्या बाहेर देखील रुग्णांना बसायला लाकडी बाक होती ,मात्र तरीही विशेष असा एक मोठ्या किमतीचा आणि आकाराचा सोफासेट देखील होता .त्या सोफ्यावर विभागातील कर्मचारी सुद्धा बसण्याअगोदर एक वेळ विचार करायचे .त्या सोफ्या सेट कडे बघून दरवाजाच्या बाहेरच साधारण  रुग्ण इथे नको असे म्हणायचे. लहान मुलं तर त्याच्याकडे एकटक बाहेरून दरवाजातून पहात बसत. एवढा तो आकर्षक सोफासेट होता .त्या विभागात नुकताच एक जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनियुक्त झाला होता .परमनंट असला तरी प्रोबेशनरी असा त्याचा काळ सुरू होता. त्याला वरिष्ठांकडून सक्त ताकीद दिली जायची त्या सोफ्याची जबाबदारी आता सर्वस्वी  त्याची .नवीन असल्या कारणाने त्याची त्या विभागात ओळख कमी .एकदा एक पांढरी कडक इस्त्री मारलेला सफारी घातलेला मध्यमवयीन गृहस्थ आतमध्ये हातात फाईल चा लहान गठ्ठा  घेऊन विशेष विभागात आला. कोणताही आडपडदा न ठेवता त्या सोफ्या वरती बसला .ते पाहून नवनियुक्त कर्मचाऱ्याला अंगावर असलेली जबाबदारी आठवली .पर्मनंट असलेल्या कर्मचाऱ्या प्रमाणे  तो म्हणाला तुम्ही असे बसू नका ,ही जागा तुमच्यासाठी नाही .बस एवढेच की काय कारण एवढा वेळ मोबाईल मध्ये मान खाली घालून गुंतलेला तो सफारी सूट वाला मान वरती करून उभा राहिला .तुला माहित आहे का मी कोण आहे असं तो म्हणाला .यावर नवनियुक्त उत्तरला नाही मला माहित नाही पण तुम्हाला येथे बसता येणार नाही. आता मात्र सफारी सूट वाला थोडा आवाज चढवून  त्याला म्हणाला की तू इथे नवीन दिसतोस म्हणून तुझी एवढी हिंमत झाली .आता तुझ्या जागेवर दुसरा माणूस आणून बसवतो की नाही बघ .नाही तर  माझं नाव लावणार नाही .असा ओरडून तो मग कुणालातरी फोन लावू लागला. मग मात्र आपण चुकीच्या माणसा सोबतच पंगा घेतला असं त्या नवनियुक्तला वाटले नंतर  तो म्हणाला की साहेब मला माफ करा माझी चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही, मी तुम्हाला ओळखले नाही .असं म्हणून त्याने अक्षरशः त्याचे पाय पकडले. एवढ्यातच आत मधील वरिष्ठ बाहेर आले त्यांनी त्या सफारी वाल्या गृहस्थाची मनधरणी केली अन त्याला आत मध्ये घेऊन गेले .थोड्यावेळानंतर तो सफारी वाला बाहेर निघाला पण निघताना एक नजर नवनियुक्त कडे टाकून गेला.थोड्या वेळानंतर वरिष्ठांनी त्या नवनियुक्त ला आत बोलवून घेतले .ते सांगत होते की तो गृहस्थ हातात फाईल घेऊन जो होता तो आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा खाजगी सचिव आहे .आता पुढच्या महिन्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री आपल्या विभागात भेट देणार आहेत तेव्हा जरा सांभाळून राहा आणि विशेष काळजी घे .असे वरिष्ठांनी त्या कर्मचाऱ्याला सांगितले तो कर्मचारी मात्र कसातरी चेहरा करत बाहेर पडला .
मोहन मुठाळ

Comments

Popular Posts